मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबीची धडक कारवाई; १३ पुरुष व १० महिलांवर कारवाई

घोडसगाव-चिखली परिसरात अश्लील कृत्ये केल्याप्रकरणी मुंबई पोलीस कायद्यान्वये गुन्हा; सर्व महिला राजस्थानमधील
जळगाव | प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव-चिखली गावांच्या सीमेवरील बुलढाणा जिल्हा हद्दीलगत काही हॉटेलांच्या मागील परिसरात व शेतामध्ये पुरुष व महिला अश्लील कृत्ये करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी धडक कारवाई करत १३ पुरुष आणि १० महिलांविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीचे पथक घटनास्थळी पोहोचले. छापा टाकल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये करत असल्याचा आरोप असलेल्या २३ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम ११० व ११७ अन्वये कारवाई करण्यात आली. कारवाईतील सर्व महिला राजस्थान राज्यातील असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
पीटा कायदा लागू करण्यात आला नाही
या प्रकरणात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा, १९५६ (PITA) अंतर्गत कारवाई करण्यात आलेली नाही. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, या कारवाईत मानवी तस्करी, जबरदस्ती, कुंटणखाना चालविणे किंवा वेश्याव्यवसायासाठी व्यक्तींचा वापर केल्याचे पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे या टप्प्यावर मुंबई पोलीस कायद्यातील सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तनासंबंधीच्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात आल्याचे समजते.
पुढील तपास सुरू
या प्रकरणात संबंधित व्यक्ती तेथे कशासाठी जमल्या होत्या, त्यामागे कोणते संघटित रॅकेट किंवा इतर बेकायदेशीर प्रकार आहेत का, याचा तपास पोलीस करीत आहेत. तपासातून नवीन बाबी समोर आल्यास त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.









