पहाटे चार तासांची विशेष मोहीम; ६० गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती, २७ संशयित ताब्यात
भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच रेल्वे व दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील भंगार व कोळसा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी संयुक्तपणे मंगळवारी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत व्यापक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवले. या धडक कारवाईत सराईत गुन्हेगारांना अटक, अवैध शस्त्र जप्ती आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) केदार बारबोले यांच्या नेतृत्वात पार पडली.
रेल्वे पोलीस ठाण्याचे तीन गैरजामीनपात्र वॉरंट (NBW) बजावण्यात आले. यामध्ये सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट (उर्फ श्याम काल्या) याला अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पंचशील नगर परिसरातून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पाहिजे असलेला आरोपी शोहेब शाह शरीफ शाह याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दीपनगर पॉवर प्लांट परिसरात कारवाईदरम्यान राजू सुरवाडे (रा. निंभोरा) याच्याकडून चोरीतील सुमारे ५० किलो केबल व केबल कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील केबल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला.
६० गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती
भंगार व कोळसा चोरीतील रेकॉर्डवरील ६० सराईत आरोपींच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच २७ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून ५ भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.
डिजिटल गुन्हेगार नोंदी अद्ययावत
कारवाईदरम्यान पकडलेल्या व संशयित व्यक्तींची अद्ययावत डिजिटल नोंद तयार करून जळगाव पोलीस व RPF यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यात आली. त्यामुळे भविष्यात रेल्वे व शासकीय मालमत्तेवरील गुन्ह्यांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.

मोठा पोलीस फौजफाटा सहभागी
या संयुक्त मोहिमेत पोलीस व RPF चे ११ अधिकारी, ५३ कर्मचारी तसेच जळगाव मुख्यालयातील ३ RCP प्लाटून सहभागी झाले होते. यात SDPO, प्रोबेशनरी DySP, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि RPF अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

रेल्वे आणि शासकीय मालमत्तेची चोरी करणाऱ्यांविरुद्ध अशा प्रकारच्या धडक कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परिसरात संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









