भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास

पारोळा बसस्थानक ते पिंपरखेड मार्गावरील घटना
पारोळा | प्रतिनिधी
पारोळा शहरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै रोजी दुपारी २.३० ते २.५० वाजेच्या दरम्यान पारोळा बसस्थानक ते पिंपरखेड मारोती मंदिरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने महिलेच्या संमतीशिवाय तिच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल आणि १ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या मण्यांसह एकूण २० हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.
याप्रकरणी मनीषा रावसाहेब पाटील (वय ४०, रा. डी.डी. नगर, पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कैलास साळुंखे करीत आहेत.









