शेतातील शेड फोडून १९ डुकरांची चोरी; ८४ हजारांचा फटका

चाळीसगाव तालुक्यातील शेवरी शिवारातील घटना; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
चाळीसगाव | प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील शेवरी शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतातील शेड फोडून तब्बल १९ डुकरांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत शेतकऱ्याचे ८४ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेवरी शिवारातील गट क्रमांक ४९ मधील शेतात असलेल्या शेडमध्ये २४ जुलै रोजी रात्री ८ ते २५ जुलै रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी लोखंडी जाळी तोडून प्रवेश केला.
चोरट्यांनी शेडमधून सुमारे दोन वर्षे वयाची चार मोठी डुकरे (किंमत २४ हजार रुपये) तसेच चार महिन्यांची १५ लहान डुकरे (किंमत ६० हजार रुपये) असा एकूण ८४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी ब्राम्हणशेवगे येथील शेतकरी इंद्र भिमराव पवार (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश चव्हाण करीत आहेत.









