मालकनगरात घरफोडी; सोन्याचे दागिने व तीन मोबाईलसह ७० हजारांचा ऐवज लंपास

एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव | प्रतिनिधी
जळगाव शहरातील मालकनगर, बॉम्बे बेकरीमागील परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख रुस्तम शेख निजाम (वय ६६, रा. मालकनगर, बॉम्बे बेकरीमागे, जळगाव) यांच्या राहत्या घरात २५ जुलै रोजी रात्री ११.३० ते २६ जुलै रोजी पहाटे ४.३० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून चोरी केली.
चोरट्यांनी १ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पान, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने, तसेच विवो Y-12, विवो Y-35 आणि रेडमी कंपनीचे मोबाईल फोन असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या प्रकरणी शेख रुस्तम शेख निजाम यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.









