जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयातील प्रकार
जळगाव (प्रतिनिधी ) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘स्मार्ट सर्व्हिस’ या ठेकेदार कंपनीमार्फत भरती करण्यात आलेल्या कक्षसेवक व अन्य कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षित कारभारामुळे रुग्ण सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कामाचा कोणताही अनुभव व प्रशिक्षण नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांकडून चुकांवर चुका होत असून, याचा नाहक त्रास रुग्णांसह येथील डॉक्टर आणि परिचारिका वर्गाला सहन करावा लागत आहे.

स्मार्ट सर्व्हिस कंपनीमार्फत गेल्या वर्षभरापासून रुग्णालयात विविध पदांवर शेकडो कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. मात्र, या भरतीदरम्यान कुठल्याही प्रकारे योग्य निकष न पाळता केवळ ओळखी-पाळखीवर आणि राजकीय वशिलेबाजीतूनच या जागा भरल्याचा थेट आरोप केला जात आहे. कामावर रुजू करून घेताना या कर्मचाऱ्यांना कुठलेही वैद्यकीय किंवा रुग्णालय व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.
ओपीडी अन् वॉर्डांमध्ये रोजच उडतोय गोंधळ
गर्दीचे अपुरे व्यवस्थापन : बाह्यरुग्ण विभागात (OPD) रुग्णांची मोठी गर्दी असते. मात्र, येथील कर्मचाऱ्यांना कोणता कक्ष कुठे आहे, याची साधी माहितीही रुग्णांना देता येत नाही. गर्दी नियंत्रणात अपयश आल्याने ओपीडीच्या बाहेर रोजच धांदल उडत आहे.
परिचारिकांवर वाढता ताण : सोनोग्राफी कक्ष व विविध वार्डांमध्ये तैनात कक्षसेवकांना दिलेल्या सूचनाही समजत नाहीत. परिणामी, परिचारिकांनाच स्वतःची कामे सोडून या कर्मचाऱ्यांचीही कामे करावी लागत असल्याने परिचारिका वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे.
उपचारात अडथळे : वैद्यकीय पथक आणि डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना व तपासणीच्या सूचना देताना या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागते. मात्र कंत्राटी कर्मचारी अप्रशिक्षित असल्याने वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे.
‘एसएमएस’ ठेकेदाराच्या तुलनेत सेवा ढेपाळली
यापूर्वी रुग्णालयात ‘एसएमएस’ (SMS) कंपनीचा ठेका असताना कार्यरत असलेला कक्षसेवक वर्ग अत्यंत प्रशिक्षित आणि अनुभवी होता. त्यामुळे रुग्ण सेवा देताना डॉक्टर किंवा परिचारिकांना कोणतीही अडचण येत नव्हती. मात्र, नवा ठेका मिळालेल्या स्मार्ट सर्व्हिस कंपनीच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा ढेपाळली आहे.
वरिष्ठांचे सोयीस्कर दुर्लक्ष?
रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांचे हाल होत असताना आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण येत असतानाही, रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी या गंभीर प्रकाराकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या अप्रशिक्षित कर्मचाऱ्यांना तात्काळ योग्य प्रशिक्षण द्यावे किंवा या भोंगळ कारभारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रुग्ण व नागरिकांमधून जोर धरत आहे.









