बारी समाज माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी

शिरसोली (प्रतिनिधी) : शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक विद्यालयात दि. २३ जुलै रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक सुनील भदाणे हे होते. त्यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रसेवा, शिक्षण आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला. तसेच “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या लोकमान्यांच्या प्रेरणादायी घोषणेचा अर्थ विद्यार्थ्यांना समजावून सांगत त्यांच्या विचारांचे आजच्या पिढीसाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती बी. टी. ठाकरे यांनी केले. ज्येष्ठ शिक्षिका सौ. नंदा अकोले यांनी लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा आणि कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. यावेळी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक बी. आर. बारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी जी. बी. काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.









