कुसुंबा येथे धारदार चॉपरसह दहशत माजविणारा युवक जेरबंद

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुसुंबा येथील तुळजाईनगर परिसरात हातात धारदार चॉपर घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या एका युवकाला एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशिल रघुनाथ सोनवणे (वय १९, रा. इंदिरानगर, कुसुंबा) हा दि. २४ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास तुळजाईनगर परिसरात हातात धारदार चॉपर घेऊन फिरत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत होता. याबाबतची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.
यावेळी त्याच्याकडून एक धारदार चॉपर जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अंमलदार अनिल कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे करीत आहेत.









