पिंपरूड ते वढोदा मार्गावर १.२० लाखांचे विद्युत कंडक्टर चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध फैजपूर पोलिसांत गुन्हा

यावल: तालुक्यातील पिंपरूड उपकेंद्र ते वढोदा दरम्यान टाकण्यात आलेल्या विद्युत वाहिनीवरून तब्बल १ लाख २० हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनियम कंडक्टर अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हैदराबाद येथील एनसीसी (NCC) कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने पिंपरूड उपकेंद्र ते वढोदा या मार्गावर विद्युत वाहिनी उभारणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मार्गावरील नितीन राणे यांच्या शेतापासून ते नितीन महाजन यांच्या शेतापर्यंतच्या परिसरात टाकण्यात आलेल्या विद्युत वाहिनीवरील ११ स्पॅनचे अॅल्युमिनियम कंडक्टर अज्ञात चोरट्यांनी कापून नेल्याचे कामादरम्यान कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. ही चोरीची घटना २२ जुलै २०२६ रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते २३ जुलै २०२६ रोजी दुपारी एक वाजेच्या कालावधीत घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी एनसीसी कंपनीचे शासकीय ठेकेदार सागर भीमराव सपकाळे (वय ३४, रा. लुंबिनी नगर, बामणोद, ता. यावल) यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा रजिस्टर क्रमांक १५९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या चोरीच्या गुन्ह्याचा पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार विशाल मोहे करत आहेत.









