जळगाव शहरातील नवीन जोशी कॉलनीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – येथील नवीन जोशी कॉलनी भागात एका ३८ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवीन जोशी कॉलनीतील रहिवासी गणेश शिवाजी गोंधळी (कासारे), वय ३८ यांनी सोमवार, २० जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या स्वयंपाकघरात गळफास घेतला. गणेश हे किराणा दुकानात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.
घटना घडली तेव्हा घरात त्यांचा लहान मुलगा उपस्थित होता. वडिलांना अशा अवस्थेत पाहून त्याने हंबरडा फोडला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी तातडीने मदतीसाठी धावून आले.
शेजाऱ्यांच्या मदतीने गणेश यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
मृत गणेश गोंधळी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.









