इंदापूर येथून आरोपीला ताब्यात; गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त
जळगाव ( प्रतिनिधी ) – मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मुलीसोबतचा फोटो वापरून त्यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित करणाऱ्या आरोपीला जळगाव सायबर पोलिसांनी अटक केली आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे बीड जिल्ह्यातील आरोपीचा शोध घेत त्याला पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरलेला मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपा जळगाव येथील नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी १९ जून २०२६ रोजी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मुलीसोबतचा फोटो वापरून “भारत बालाजी म्हस्के” या नावाने बनावट फेसबुक खाते तयार करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत तसेच सायबर पोलीस निरीक्षक प्रदीप वाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी भारत बालाजी म्हस्के (वय ३४, रा. गोंदी खुर्द, ता. गेवराई, जि. बीड) याचा शोध घेण्यात आला. त्याला इंदापूर (जि. पुणे) येथून ताब्यात घेऊन जळगाव येथे आणण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुमारे ३० हजार रुपये किमतीचा Oppo Reno 15 5G मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, आरोपीने वापरलेले सुमारे ६ हजार फॉलोअर्स असलेले बनावट फेसबुक खाते संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सहकार्याने कायमस्वरूपी बंद करण्यात आले असून, आक्षेपार्ह पोस्टही हटविण्यात आल्या आहेत.









