
अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार; पीडिता माता बनल्यानंतर नराधम आरोपीला अटक
जळगाव (प्रतिनिधी):- अमळनेर तालुक्यातील बोदर्डे परिसरातील एका गावामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. गावातील एका संशयित नराधमाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली असून तिने बाळाला जन्म दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी मारवड पोलिसांनी तातडीने कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बोदर्डे परिसरातील पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही, गावातीलच एका संशयित नराधमाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर तिच्या संमतीशिवाय वारंवार शारीरिक संबंध ठेवले. ८ मार्च २०२६ च्या आधीच्या सहा महिन्याया कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी हे अत्याचार करण्यात आले. संशयित आरोपीच्या अत्याचारामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली. ही बाब लपवून ठेवण्यात आली होती, मात्र प्रसूतीची वेळ जवळ आल्यानंतर २१ जून २०२६ रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास पीडितेला धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (रुग्णालयात) दाखल करण्यात आले. तिथे पीडित मुलीने एका नवजात बालकाला जन्म दिला. मुलगी अल्पवयीन असताना गरोदर राहून तिची प्रसूती झाल्याने हा गंभीर प्रकार समोर आला.
याप्रकरणी पीडित मुलीच्या ३९ वर्षीय वडिलांनी (व्यवसाय- मजुरी) १३ जुलै २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता मारवड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी विनोद ब भिल्ल (रा. बोदर्डे परिसर, ता. अमळनेर) याच्याविरुद्ध मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १२५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ६४(२)(M) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा २०१२) चे कलम ४, ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद करताना पोलिसांनी ‘ई-साक्ष’ प्रणालीचा वापर केला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता मारवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) श्री. साजिद मजिद मन्सुरी यांनी तात्काळ पथक रवाना करून आरोपी विनोद भिल्ल याला अटक केली आहे. मारवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) विनोद पवार या गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे अमळनेर तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.










