
पाय फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तीची विचारपूस करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश; विश्वासाचा गैरफायदा घेत आर्थिक फसवणूक
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील शनिपेठ परिसरात विश्वासघाताची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पायाला फ्रॅक्चर झालेल्या व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी घरी आलेल्या ओळखीच्या व्यक्तीने घरातील एटीएम कार्ड चोरून त्याच्या खात्यातून २९ हजार रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित अशोक चांगरे (वय ३७, रा. गुरुनानक नगर, शनिपेठ, जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ते जळगाव महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत.
फिर्यादीनुसार, १ जुलै २०२६ रोजी पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे ते घरी उपचार घेत होते. त्यावेळी ओळखीचा आदर्श मनोज चव्हाण उर्फ पापा (रा. गुरुनानक नगर, जळगाव) हा त्यांची विचारपूस करण्यासाठी घरी आला होता. याच संधीचा फायदा घेत त्याने घरातील इंडियन बँकेचे एटीएम कार्ड परस्पर चोरून नेले.
त्यानंतर संबंधित एटीएम कार्डचा वापर करून फिर्यादी यांच्या इंडियन बँकेच्या खात्यातून २९ हजार रुपये काढून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०३(२) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस कर्मचारी विजय खैरे करीत असून, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.









