
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा


२२ ते २६ जुलैदरम्यान शिबिरांचे आयोजन; १३ जुलैपर्यंत लाभार्थ्यांच्या याद्या सादर करण्याच्या सूचना
जळगाव, राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत दि. २२ ते २६ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी डॉ श्रीमंत हारकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली.
बैठकीस महसूल, कृषी, जिल्हा परिषद, लीड बँक तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी अभियानाद्वारे पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक नियोजन, विभागनिहाय समन्वय, विविध शासकीय लाभांचे वितरण तसेच अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत सर्व संबंधित विभागांनी आपल्या विभागामार्फत लाभ देण्यात येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची अद्ययावत यादी तयार करून सोमवार, १३ जुलै २०२६ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ श्रीमंत हारकर यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उपजिल्हाधिकारी (महसूल) विजयकुमार ढगे, तहसीलदार (महसूल) श्रीमती ज्योती गुंजाळ तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अभियानाच्या माध्यमातून पात्र नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.









