नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या ५५० श्री सदस्यांचे श्रमदान; हरित परिसर निर्मितीचा संदेश
जळगाव ( प्रतिनिधी ) –पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने जळगाव पोलीस दल आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि. ८ जुलै) जळगाव पोलीस मुख्यालयात भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात एकूण २,३२० विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.


कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत, वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश दिला.
या अभियानात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे ५५० श्री सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. त्यांच्या श्रमदानातून पोलीस मुख्यालय परिसरात नियोजनबद्ध पद्धतीने विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित परिसर निर्मितीचा संदेशही देण्यात आला.
कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपअधीक्षक (गृह शाखा) संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांच्यासह जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व श्री सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘वृक्ष लागवडीसोबत संवर्धनही तितकेच महत्त्वाचे’
“पर्यावरण संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. वृक्षारोपण करून थांबून चालणार नाही, तर त्या वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणेही तितकेच आवश्यक आहे. अशा उपक्रमांमधून पर्यावरणाबाबत समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण होते.”
— श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव









