खिशात सुसाईड नोट आढळल्याने गूढ वाढले; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
वरणगाव (प्रतिनिधी): – भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे दत्तात्रय (दत्तू) गोपाळ चौधरी (वय ४५) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे फुलगाव परिसरात शोककळा पसरली असून, मयताच्या खिशात सुसाईड नोट आढळल्याने आत्महत्येमागील कारणाबाबत गूढ निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान दत्तात्रय चौधरी यांनी घराच्या वरच्या मजल्यावरील छताला बसविण्यात आलेल्या लोखंडी पाईपाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. त्यावेळी घरात इतर कोणीही नसल्याचे सांगण्यात येत आहे.
काही वेळाने ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने खाली उतरवून उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुरावे गोळा केले. मयताच्या अंगझडतीदरम्यान त्यांच्या खिशातून एक सुसाईड नोट, गाडीची चावी, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
तथापि, सुसाईड नोटमध्ये नेमके काय नमूद करण्यात आले आहे, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. नातेवाईकांनाही नोटमधील मजकूर सांगण्यात आलेला नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आत्महत्येमागील कारणाबाबत गावात विविध तर्क-वितर्क लावले जात असले, तरी तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
दत्तात्रय चौधरी हे वरणगाव येथील आयुध निर्माणीमध्ये कंत्राटी स्वरूपात काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, फुलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









