चाळीसगाव (प्रतिनिधी): – चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुरेश विजय सोनवणे (वय २४, रा. जुनोने, ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोरील सार्वजनिक जागेत हा प्रकार घडला. जनार्दन कचरू माळी व दयाबाई कचरू माळी (दोघे रा. जुनोने, ता. चाळीसगाव) यांनी कोणतेही कारण नसताना सुरेश सोनवणे यांच्या काका विनोद सोनवणे व काकू सुरेखा सोनवणे यांना शिवीगाळ केली.
यावेळी सुरेश सोनवणे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, जनार्दन माळी यांनी त्यांना चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दयाबाई माळी यांनी हातातील लोखंडी फावड्याने सुरेश सोनवणे यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली. तसेच “आज तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 351(2), 352 आणि 353(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. प्रविण सांगेले करीत आहेत.








