ग्राहकांना वापरावर निर्बंध, मात्र महावितरण कार्यालयात शेगडीसह चहा व स्वयंपाकाची भांडी आढळल्याने म्हसावद येथे आक्रमक आंदोलन
जळगाव (प्रतिनिधी) :- स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात आंदोलन करण्यासाठी जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील महावितरण कार्यालयात गेलेल्या नागरिकांना तेथे एक धक्कादायक प्रकार आढळून आला. ग्राहकांना ‘हेवी लोड’चे कारण देत इलेक्ट्रिक शेगडीच्या वापरावर निर्बंध घालणाऱ्या महावितरण कार्यालयातच चक्क इलेक्ट्रिक शेगडी वापरात असल्याचे दिसून आले.


कार्यालयात इलेक्ट्रिक शेगडीसह चहा बनविण्याची व स्वयंपाकाची भांडीही आढळून आल्याने आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. ग्राहकांना एक नियम आणि महावितरण कर्मचाऱ्यांसाठी दुसरा नियम का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
दरम्यान, स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांनी संबंधित शेगडीचा वापर इमर्जन्सीमध्ये चहा बनविण्यासाठी व इतर आवश्यक कारणांसाठी केला जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.
मात्र, महावितरणच्या कार्यालयातच ग्राहकांना निर्बंध असलेल्या उपकरणाचा वापर होत असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.









