जोशीपेठेतील दुर्घटनेने हळहळ; उंचावर काम करताना विद्युत प्रवाह सुरू झाल्याने कोसळला
जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील जोशी कॉलनी (जोशीपेठ) परिसरातील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम सुरू असताना विजेचा तीव्र धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी घडली. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत तरुणाचे नाव मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा. मासूमवाडी, जळगाव) असे आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तकीम हा गेल्या सुमारे २० दिवसांपासून एका ठेकेदाराकडे इलेक्ट्रिक कामगार म्हणून कार्यरत होता. शनिवारी जोशीपेठ येथील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते. यावेळी तो उंचावर चढून विद्युत वायर जोडत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाला. त्यामुळे त्याला जोरदार विजेचा धक्का बसला आणि तो उंचावरून खाली कोसळला.
अपघातानंतर त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी मुस्तकीमला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
मुस्तकीमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. त्याचे वडील मसाले विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. घरातील तरुण आणि कमावत्या मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व मित्रांनी एकच आक्रोश केला. या घटनेमुळे मासूमवाडीसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.









