अमळनेर (प्रतिनिधी) :- जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) शुक्रवारी पहाटे अमळनेर शहरातील पारधीवाडा आणि जपान जिन परिसरात एकाच वेळी धडक कारवाई करत बेकायदेशीर गोवंश कत्तलीच्या कथित रॅकेटला मोठा धक्का दिला. या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ६ संशयित घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोवंश मांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे आणि साहित्य जप्त केले असून तीन जिवंत बैलांची सुटका करण्यात आली आहे.


सकाळी ६ ते १२ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पारधीवाडा परिसरातून हसनखान गुलाबखान पठाण (६५), मोहसीनखान हसनखान पठाण (३५), फराजखान हमीदखान कुरेशी (२०), अर्षदखान अजीजखान कुरेशी (४८), रियाज अहमद अब्दुल शकुर कुरेशी (५५), तन्वीर शेख ताहेर कुरेशी (४१), जावेदखान सुलेमानखान कुरेशी (५०), अब्दुल शेख नुरा कुरेशी (५०), अजीज शेख नजीर कुरेशी, अल्ताफखान अजीजखान कुरेशी (५६) आणि शरीफ शेख अकबर कुरेशी (२५) यांना ताब्यात घेण्यात आले.
तर इकबाल शेख आहत शेख कुरेशी, जहांगीर शेख साबीर शेख कुरेशी, आरीफ अजीज कुरेशी, जाबीर खान अब्बासखान कुरेशी, जहीरखान जाबीरखान कुरेशी आणि शरीफ खान मजीदखान कुरेशी हे संशयित घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान विविध वयोगटातील गोवंशाचे सुमारे १ हजार ५७५ किलो मांस जप्त करण्यात आले. या मांसाची अंदाजित किंमत ३ लाख १५ हजार रुपये आहे. तसेच चार लोखंडी कुऱ्हाडी, नऊ लोखंडी सुऱ्या, सहा लोखंडी कोयते, दोन वजन काटे आणि मापे असा एकूण ३ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याशिवाय आरोपी जावेदखान कुरेशी याच्या जपान जिन परिसरातील पत्र्याच्या शेडमधून १२ ते १६ वर्षे वयोगटातील तीन पांढऱ्या रंगाचे गावरान बैल आढळून आले. या जनावरांची अंदाजित किंमत १ लाख ५५ हजार रुपये असून त्यांची सुटका करून सुरक्षितपणे गोशाळेत हलविण्यात आले.
या कारवाईत एकूण ४ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश वाठोरे यांच्या उपस्थितीत गोवंश मांसाचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी (सीए) सीलबंद करण्यात आले. उर्वरित मांस अमळनेर नगर परिषदेच्या मदतीने पंचांसमक्ष खड्डा खोदून नष्ट करण्यात आले. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून फरार संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.









