पाचोरा (प्रतिनिधी) : तीन गायींची विनापरवाना व अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याप्रकरणी पाचोरा शहर पोलिसांनी एका वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तीन गायी व मालवाहू वाहन असा एकूण २ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जून रोजी सायंकाळी ५.३० ते ५.४५ वाजेच्या दरम्यान पाचोरा शहरातील श्रीराम मंदिराजवळील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल दिपक नाना पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेंद्र बापू मापारे (वय २५, रा. डोंगरगाव, ता. पाचोरा) हा त्याच्या ताब्यातील एमएच-०९-एफएल-८०६६ क्रमांकाच्या मारुती सुझुकी सुपर कॅरी वाहनातून तीन गायींची विनापरवाना तसेच चारा-पाण्याची व्यवस्था न करता क्रूरपणे वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.
पोलीसांनी वाहन अडवून तपासणी केली असता वाहनात तीन गायी आढळून आल्या. त्यानंतर गायींना पाचोरा येथील गोशाळेत सुरक्षित ठेवण्यात आले. या कारवाईत सुमारे २९ हजार रुपये किमतीच्या तीन गायी व २ लाख रुपये किमतीचे मालवाहू वाहन असा एकूण २ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१३/२०२६ अन्वये प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम, १९६० मधील कलम ११(१)(घ)(ड) तसेच मोटार वाहन कायदा कलम ८३/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









