आंतरराज्य दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड!

मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; २५ लाखांच्या ३० मोटारसायकली जप्त
मुक्ताईनगर, प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या कडक निर्देशानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी आंतरराज्य पातळीवर धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी दोन मुख्य संशयितांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल २५ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ३० मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीचा आधार घेतला. याद्वारे पोलिसांनी संशयास्पद हालचालींवरून विशाल सुरेश सोनवणे (रा. पिंपरुड, ता. यावल) आणि कुंदन सुनिल महाले (रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) या दोघांसह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी जळगावसह आंतरराज्य पातळीवर केलेल्या चोऱ्यांचा मोठा पाढाच पोलिसांसमोर वाचला.
तपासादरम्यान या टोळीची चोरी करण्याची आणि गाड्या विकण्याची एक धक्कादायक पद्धत समोर आली आहे. हे चोरटे विविध शहरांमधून दुचाकी चोरायचे आणि पोलिसांचा संशय येऊ नये म्हणून त्या गाड्या थेट रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवरील ‘पे अँड पार्क’ (Pay & Park)मध्ये आणून उभ्या करायचे. त्यानंतर ग्राहकांशी सौदा पक्का झाला की, तेथूनच थेट गाड्यांची विक्री केली जायची.
जप्त करण्यात आलेल्या ३० मोटारसायकलींपैकी अनेक गाड्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून चोरलेल्या आहेत. या टोळीच्या अटकेमुळे गुजरातमधील उधना (सुरत) तसेच महाराष्ट्रातील कल्याण, नेरुळ, निफाड, वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, नेरळ, पारोळा, जिल्हापेठ (जळगाव) आणि एरंडोल अशा तब्बल १३ पोलीस ठाण्यांमधील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली, मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या कारवाईत पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय खंडेराव, महेंद्र सुरवाडे, पोलीस नाईक असिम तडवी, कल्पेश आमोदकर व इतर सहकाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. आंतरराज्य टोळी गजाआड झाल्याने वाहनधारकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.









