८० हजारांचे नुकसान, दोन गावांचा पाणीपुरवठा धोक्यात
चाळीसगाव, ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील कडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाघले धरण परिसरातील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे सुमारे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले असून रोकडे व लोणजे गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रोकडे येथील सरपंच प्रमोद पाटील आणि पाणीपुरवठा कर्मचारी हे रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाघले धरणावरील विहिरीवर पंप सुरू करण्यासाठी गेले होते. रात्री साडेदहा वाजता वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला असता मुख्य वीज केबल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तपासणी केली असता अज्ञात चोरट्यांनी रोकडे पाणीपुरवठा योजनेच्या दोन्ही पंपांच्या बाहेरील विद्युत केबल कापून नेल्याचे आढळून आले. तसेच लोणजे गावाच्या पाणीपुरवठा योजनेच्या पंपाची वीज केबलही चोरून नेण्यात आल्याचे समोर आले.
या चोरीमुळे दोन्ही गावांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. चोरीस गेलेल्या केबलची किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी मधुकर जाधव यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.









