जळगाव, ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या गौण खनिज (वाळू) उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत १७ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ जून रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान एमएच-१९-एएन-४४३० क्रमांकाचा स्वराज ७४४ एफई ट्रॅक्टर, एमएच-१९-एडी-२७९४ क्रमांकाचा टाटा १६१३ डंपर, एमएच-१९-एडी-४२२८ क्रमांकाचा अशोक लेलँड डंपर, एमएच-१९-जे-०३१० क्रमांकाचा टाटा ट्रक, एमपी-०४-जीए-२१८८ क्रमांकाचा डंपर, तसेच एमएच-१९-सीडब्ल्यू-३६३६ क्रमांकाचा डंपर अशी एकूण १७ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहने जप्त करण्यात आली.
याप्रकरणी सतीश एकनाथ कुंभार, गणेश संजय कोळी, अब्दुल करीम शेख, रविंद्र गिरधर जाधव, रितेश अनिल कोळी, विशाल सुनील सपकाळे व भूषण सपकाळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२), ४९, ५४ व ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून वाहतूक केली. कारवाईची माहिती मिळताच आरोपींनी वाहने घटनास्थळी सोडून पळ काढला. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ. योगेश देविदास पाटील करीत आहेत.









