फैजपूर, ता. यावल (प्रतिनिधी) : फैजपूर शहरात अवैधरित्या गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ८० किलो गोमांसासह विविध साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

फैजपूर पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना २४ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, फैजपूर शहरातील इस्लामपुरा परिसरात सलीमखान मुसाखान कुरेशी यांच्या घरालगतच्या शेडमध्ये तसेच मिल्लतनगर परिसरात शेख साजीद शेख रहीम यांच्या घरालगतच्या कंपाऊंडमध्ये अवैधरित्या गुरांची कत्तल करून गोवंशाचे मांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली.
माहितीची खातरजमा झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ दोन्ही ठिकाणी छापे टाकले. कारवाईदरम्यान सुमारे ८० किलो वजनाचे गोमांस, तराजू, वजनमापे, मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे लहान-मोठे चाकू, कुऱ्हाडी तसेच लाकडी कुंदे असा एकूण २२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सलीमखान मुसाखान कुरेशी (वय ४५, रा. इस्लामपुरा, फैजपूर) आणि शेख साजीद शेख रहीम (वय ४६, रा. मिल्लतनगर, फैजपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस कॉन्स्टेबल राहुल नावकर यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
फैजपूर शहरासह परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.









