चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नळेगाव येथील शेतातून चोरीस गेलेल्या जलपरी पंपाचा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणत दोन संशयितांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला पंप जप्त करण्यात आला आहे.

याबाबत महेश अर्जुन चोरमले यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या शेतात गोरख निंबा मोरे यांच्या मालकीची इकोझेन कंपनीची ५ एचपी क्षमतेची जलपरी मोटार १७ ते १९ जून दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राकेश उर्फ विक्की रामलाल मोरे (वय २५, रा. तळेगाव) आणि सोनगिर उर्फ शंभू हिरागीर गोसावी (वय ३३) यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी चोरीची कबुली दिली.
यानंतर आरोपींकडून इकोझेन कंपनीचा ५ एचपी क्षमतेचा जलपरी पंप, किंमत सुमारे ५ हजार २०० रुपये, जप्त करण्यात आला. जप्तीचा पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, सहाय्यक फौजदार युवराज नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम चव्हाण, गणेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर वाघ यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश चव्हाण करीत आहेत.









