जळगाव ( प्रतिनिधी ) :- “तुम्ही विहिरीचे ठिकाण बदलले असून तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर विहिरीचे पुढील अनुदान पाहिजे असेल, तर मला ३० हजार रुपये द्यावे लागतील,” अशी धमकीवजा मागणी करत ३० हजारांची लाच मागणार्या जामनेर पंचायत समिती कार्यालयातील तांत्रिक सहाय्यक (कंत्राटी कर्मचारी) सागर अशोक नावकर (वय ३२, रा. गणपतीनगर, तळेगाव, ता. जामनेर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची जामनेर शिवारात शेती असून, त्यांना सन २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षात पंचायत समितीकडून सिंचन विहीर मंजूर झाली होती. पंचायत समितीचे कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सागर नावकर याने प्रस्तावित विहिरीची स्थळ पाहणी करण्यापूर्वीच तक्रारदाराकडून गावातील रोजगार सेवकामार्फत ३० हजार रुपये स्वीकारले होते व त्यानंतर स्थळ पाहणी करून फोटो काढले होते. यानंतर तक्रारदाराला पंचायत समितीकडून वेळोवेळी ६० हजार ९६६ रुपये मिळाले होते. मात्र, विहिरीचे उर्वरित अनुदान मिळवून देण्यासाठी सागर नावकर याने तक्रारदाराकडे पुन्हा ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
पडताळणीत लाच मागितल्याचे स्पष्ट, गुन्हा दाखल
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) रीतसर तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ८ एप्रिल आणि दि. १४ मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, तांत्रिक सहाय्यक सागर नावकर याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची मागणी स्पष्ट होताच एसीबीच्या पथकाने कारवाई करत आरोपीविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे जामनेर शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.










