नवीन घरासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी; मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा आरोप
पारोळा, ( प्रतिनिधी ) : नवीन घर बांधण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, दीर, जेठ आणि जेठाणी अशा सहा जणांविरुद्ध पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहानंतर २९ ऑगस्ट २०२३ ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत सासरच्या मंडळींकडून तिचा वारंवार छळ करण्यात आला. नवीन घरासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी आरोपींकडून केली जात होती. मागणी पूर्ण न झाल्याने तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी पती प्रवीण रमेश सोनवणे (पाटील), सासरे रमेश भावराव सोनवणे, सासू संगीता रमेश सोनवणे, जेठ जयदीप रमेश सोनवणे, जेठाणी गौरी जयदीप सोनवणे आणि दीर सचिन रमेश सोनवणे (सर्व रा. मालेगाव, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींकडून वारंवार शिवीगाळ, मारहाण तसेच पैशांसाठी दबाव टाकण्यात येत होता. अखेर पीडित महिलेने पारोळा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदविली.
याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम ४९८-अ, ३२३, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी कैलास साळुंखे करीत आहेत.









