जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील नव्या जळगाव बायपास रोडवर ट्रकचालकाला अडवून चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना येथील गांधी चौक परिसरातील रहिवासी तथा ट्रकचालक मुकेश रामराव राठोड (वय ३०) हे २० जून रोजी पहाटे सुमारे १ वाजेच्या सुमारास नव्या जळगाव बायपास मार्गावरून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्या ट्रकसमोर चारचाकी वाहन आडवे लावून ट्रक थांबवला.
यानंतर आरोपींपैकी एका इसमाने चाकूचा धाक दाखवत फिर्यादीला धमकावले. तसेच त्याच्या हाताला दुखापत करून पैशांची मागणी केली. आरोपींनी फोन-पे स्कॅनरद्वारे ९८४ रुपये ऑनलाइन वसूल केले. तसेच ट्रकमधील साक्षीदाराच्या खिशातील ५ हजार ५०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले. अशा प्रकारे एकूण ६ हजार ४८४ रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
या प्रकरणी मुकेश राठोड यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), १२६(२), ११५(२), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.









