निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण
जळगाव, ( प्रतिनिधी ) : – महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन (पेंशन) व भविष्य निर्वाह निधी (पी.एफ.) संदर्भातील अडचणी आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय पेंशन व पी.एफ. कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला निवृत्तीवेतनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील २४३ निवृत्तीवेतनधारक तसेच ७० आहरण व संवितरण अधिकारी प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. यावेळी निवृत्तीवेतनधारकांनी एकूण ११२ तोंडी प्रश्न उपस्थित केले. त्यापैकी सुमारे ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण जिल्हा कोषागार कार्यालय, जळगाव आणि महालेखापाल कार्यालय, मुंबई यांच्या माध्यमातून करण्यात आले.
याशिवाय कार्यशाळेदरम्यान ६५ लेखी अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची शहानिशा करून महालेखापाल कार्यालय, मुंबई यांच्याशी संबंधित प्रकरणांवर पुढील स्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ लेखाधिकारी श्रीमती जया गोमेझ यांनी दिली.
ही कार्यशाळा जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्क), मुंबई येथील श्रीमती जया गोमेझ, महादेव एम. करांडे, श्रीमती सुप्रिया केळुस्कर आणि हिमांशू पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच अपर कोषागार अधिकारी खलील पटेल यांनी निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्यांचे निराकरण केले.
कार्यक्रमास अपर कोषागार अधिकारी राजू पाटोळे, गजानन देशमुख यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश कोकरे यांनी केले, तर खलील पटेल यांनी आभार प्रदर्शन केले.








