पाच बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण; ३ ते ४ लाखांचे नुकसान




निलांबरी हॉटेलमागील परिसरात दुपारी आग
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात निलांबरी हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या मुस्कान प्लास्टिक भंगार गोदामातील प्लास्टिक स्क्रॅपला शुक्रवारी दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले होते.
डीपीच्या चिंगारीमुळे आग लागल्याचा अंदाज
घटनास्थळी असलेल्या विद्युत डीपीमधून पडलेल्या चिंगारीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. प्लास्टिक स्क्रॅप असल्याने आग वेगाने पसरत होती आणि मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण होत असल्याने आग विझविण्यात अडचणी येत होत्या.
पाच अग्निशमन बंबांची मदत
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन केंद्र, गोलाणी फायर स्टेशनच्या दोन गाड्या, महाबळ फायर स्टेशन आणि शिवाजीनगर फायर स्टेशनच्या गाड्या अशा एकूण पाच अग्निशमन बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविले.
मोठा अनर्थ टळला
आग वेळीच आटोक्यात आणल्यामुळे आसपासच्या परिसरात ती पसरण्यापासून रोखण्यात यश आले. अन्यथा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या आगीत अंदाजे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन चालक युसुफ पटेल, प्रकाश चव्हाण, गोविंद माळी, मयूर देसले, प्रभाकर पाटील तसेच फायरमन संजय तायडे, योगेश पाटील, रवींद्र बोरसे, नितीन ससाने, योगेश कोल्हे, राकेश सोनवणे, सौरभ चिकटे, केतन पाटील, किरण पाटील, रुपेश पाटील, ललित पाटील, रितेश उबाळे, विनोद कोळपे, राहुल फुलपगारे, लखन माळी आदी कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आग पूर्णपणे विझवली.








