जामनेर (प्रतिनिधी) : तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारातील शासकीय वाहनाला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची धक्कादायक घटना जामनेर शहरात उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील पाचोरा रोडवरील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या परिसरात उभी असलेली टाटा सुमो (एमएच १५ एए ०१८०) ही शासकीय गाडी १७ जून रोजी रात्री ७.३० ते १८ जून रोजी पहाटे ४ वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक पेटवून दिल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारी अजय उद्धवराव मनवर (वय ४६, रा. हिवरखेडा रोड, जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, संबंधित अज्ञात व्यक्तीने शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने वाहनाला आग लावली. या आगीत वाहनाचे मोठे नुकसान होऊन अंदाजे एक लाख रुपयांची हानी झाली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप निष्पन्न झालेला नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रतापसिंग मथुरे करीत आहेत.









