एरंडोल (प्रतिनिधी) : उसन्या दिलेल्या पैशांची मागणी केल्याच्या रागातून एका व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला करून मारहाण केल्याची घटना एरंडोल-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील साई पेट्रोल पंपासमोर घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल आत्माराम महाजन (वय ३५, रा. विखरण, ता. एरंडोल) यांनी आरोपी कृष्णा नानागायकवाड आणि जितेंद्र परमेश्वर वाघमारे (दोघे रा. उरुळी कांचन, हडपसर, पुणे) यांना यापूर्वी २० हजार रुपये उसने दिले होते. या रकमेची परतफेड मागितल्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादीला अडवून वाद घातला.
यावेळी कृष्णा नानागायकवाड याने विठ्ठल महाजन यांच्या पायावर लोखंडी रॉडने वार करून गंभीर दुखापत केली. तर जितेंद्र वाघमारे यानेही मारहाण करत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना १३ जून रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. फिर्यादीच्या तक्रारीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.









