चोपडा (प्रतिनिधी) : क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या जुन्या वादातून उमर्टी गावातील एका तरुणावर विटेने हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिमन बारकू पावरा (वय २८, व्यवसाय-शेती, रा. उमर्टी, ता. चोपडा) हे १२ जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास रमेश मंगा पावरा यांच्या घरासमोर बसले होते. त्यावेळी राहुल राजू पावरा, रोहित जाला पावरा आणि दहित जाला पावरा (सर्व रा. उमर्टी) हे तेथे आले.
क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या पूर्वीच्या वादाबाबत विचारणा करत आरोपींनी अभिमन पावरा यांच्याशी वाद घातला. त्यानंतर राहुल पावरा याने जमिनीवर पडलेली वीट उचलून फिर्यादीच्या डोक्यावर व तोंडावर फेकून मारली. तसेच इतर दोन्ही आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली.
या हल्ल्यात अभिमन पावरा जखमी झाले असून त्यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.









