चोपडा (प्रतिनिधी) : बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाई करत आरोपीकडून गावठी कट्टा, दुचाकी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मामलदे (ता. चोपडा) गावाजवळील शनिमंदिरासमोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. आरोपी विनोद वसंतराव पावरा (वय २४, रा. अमळवाडी, ता. चोपडा) याच्या ताब्यात विनापरवाना गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
तपासादरम्यान आरोपीकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा, ४५ हजार रुपये किमतीची होंडा लिओ दुचाकी (एमएच १९ सीएस ६१९८) तसेच सुमारे १० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आर्म अॅक्ट कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज वाघुंजे करीत आहेत.








