स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणूक
जळगाव (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी जळगाव जिल्ह्यात रंगात आली असून, महायुतीचे (भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट) अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या प्रचाराला मोठा वेग आला आहे. जिल्ह्यातून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता, त्यांचा विजय आता स्पष्ट मानला जात आहे.



५०० पेक्षा अधिक मतदारांचा कौल मिळण्याचा अंदाज
जिल्ह्यात एकूण ६३० मतदार आहेत. यातील ५०० पेक्षा अधिक मतदार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून ते त्यांना भरघोस मतांनी विजयी करतील, असे चित्र सध्या मतदारसंघात दिसत आहे. याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी यापूर्वीच सुतवाच केले होते, त्यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.
अपक्ष आणि छोट्या पक्षांचाही पाठिंबा
महायुतीमधील तिन्ही प्रमुख पक्षांच्या ताकदीसोबतच, जिल्ह्यातील काही अपक्ष आणि छोट्या पक्षांचे नगरसेवक तसेच लोकप्रतिनिधी देखील नंदकिशोर महाजन यांच्या संपर्कात आहेत. विकासकामांचा अजेंडा पाहून हे मतदार महाजन यांनाच मतदान करतील, असा विश्वास महायुतीच्या गोटातून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महाजन यांचा विधान परिषदेतील प्रवेश निश्चित मानला जात असून, रावेर तालुक्याचे नेतृत्व म्हणून भविष्यात त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
प्रशासकीय अनुभव जमेची बाजू
नंदकिशोर महाजन यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागातील विकास कामांचा आणि प्रश्नांचा जवळून अभ्यास केला आहे. त्यांच्या या दांडग्या अनुभवाचा फायदा मतदारसंघाला नक्की होईल, याच विश्वासावर मतदार त्यांच्या नावावर पसंतीची मोहोर उमटवत असल्याचे दिसते. एकूणच, अनुभवाच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर नंदकिशोर महाजन हे सध्या निवडणुकीच्या शर्यतीत इतर उमेदवारांपेक्षा खूपच उजवे ठरत आहेत.









