निमगव्हाण शिवारातील घटना; लोखंडी फावड्याने हल्ला केल्याचा आरोप
चोपडा (प्रतिनिधी) :- चोपडा तालुक्यातील निमगव्हाण शिवारात शेताच्या बांधाच्या वादातून दोन शेतकरी भावांवर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमगव्हाण शिवारातील गट क्रमांक २३७ मधील शेतात पाणी भरण्याच्या कामावरून हा वाद उद्भवला. फिर्यादी लीलाधर अशोक पाटील (वय ४१) व त्यांचा भाऊ किशोर पाटील हे शेतात असताना शेजारील शेतकरी समाधान रमेश पाटील आणि रमेश ओंकार पाटील यांनी बांधाच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे.
वाद विकोपाला गेल्यानंतर समाधान पाटील याने हातातील लोखंडी फावड्याने लीलाधर पाटील यांच्या उजव्या पायावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच किशोर पाटील यांच्या उजव्या हाताच्या बोटाला मार लागून दुखापत झाल्याचेही सांगण्यात आले.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. घटनेचा अधिक तपास चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत असून वादाचे नेमके कारण आणि घटनेतील सर्व बाबींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.









