जळगाव (प्रतिनिधी):- जळगाव शहरातील कृष्णा नगर, सुप्रीम कॉलनी परिसरात घरासमोर बांधून ठेवलेल्या तीन बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश दिलीप परदेशी (वय ३२, व्यवसाय – मजुरी, रा. कृष्णा नगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. १० जून २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर बांधून ठेवलेल्या तीन बकऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.
चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये प्रत्येकी सुमारे १० हजार रुपये किमतीच्या दोन काळ्या रंगाच्या आणि एक तपकिरी रंगाची बकरी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरी झालेल्या बकऱ्यांची एकूण किंमत सुमारे ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रमोद लाडवंजारी करीत आहेत.








