एकाच दिवसात दोन लाखांहून अधिक दंड वसूल; वाहतूक नियमांचे पालन करण्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात सुरक्षित, शिस्तबद्ध आणि अपघातमुक्त वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने शहर वाहतूक शाखेकडून विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल २७१ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.


दि. ३ जून रोजी राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेदरम्यान हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे, वाहतूक सिग्नलचे उल्लंघन करणे, विनापरवाना वाहन चालविणे तसेच इतर विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण २ लाख ३ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
जिल्ह्यात वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. विशेष तपासणी आणि कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत सकारात्मक संदेश पोहोचल्याचे दिसून आले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे. हेल्मेट व सीटबेल्टचा नियमित वापर, वेगमर्यादेचे पालन तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळल्यास अनेक अपघात रोखता येऊ शकतात. सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली एक अधिकारी आणि २३ अंमलदारांनी मोहिमेत सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून अशा विशेष तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.









