नागपुरातून तीन आरोपी जेरबंद; १६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव,(प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत तीन आरोपींना नागपुरातून अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा सुमारे १६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात १ जून रोजी घरफोडीची तक्रार दाखल करण्यात आली होती. फिर्यादी कामानिमित्त बाहेर गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपास करून आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार विशेष पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपी नागपुरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. यावेळी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत : – राजू जसपालसिंग,भोला उर्फ बिरेंद्र सुखदेव पासवान, राजेश पारस शाह हे तिघेही मूळचे हरियाणा व बिहार राज्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा १६.३४ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने केली. अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.








