पाचोरा ( प्रतिनिधी ) – प्रेमाचे आमिष दाखवत तसेच जीवे मारण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अनिल प्रकाश महाजन (रा. बांबरूड (राणीचे), ता. पाचोरा, जि. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत आरोपीने पीडित महिलेशी जवळीक साधत तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. “तू मला खूप आवडतेस, तुझ्या पतीला सोडून माझ्यासोबत ये,” असे सांगून आरोपीने महिलेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विविध ठिकाणी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पीडित महिलेने या प्रकाराबाबत कोणालाही माहिती दिल्यास जीवे मारण्याची तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी आरोपीकडून देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भीतीपोटी महिलेने दीर्घकाळ तक्रार केली नसल्याचे समजते.
या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६६/२०२६ दाखल करण्यात आला असून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ६४(२)(एम) आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राथमिक तक्रार अन्य पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आल्यानंतर ती ऑनलाइन पद्धतीने पाचोरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पाचोरा पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.









