भरधाव डंपरची मोटरसायकलला जोरदार धडक; महिलेसह एक गंभीर जखमी
यावल (प्रतिनिधी) :- यावल-भुसावळ मार्गावरील अंजाळे घाट परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. भरधाव डंपरने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, लखन अशोक जोहरी (वय ३२, रा. यावल) हे त्यांच्या मोटरसायकलने भुसावळकडून यावलकडे येत होते. त्यांच्या दुचाकीवर वहिनी अनिता संदीपसिंग जोहरी (वय ५०) या देखील प्रवास करत होत्या. दरम्यान, यावलहून भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने अंजाळे घाट परिसरात त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
डंपरची धडक अत्यंत भीषण असल्याने लखन जोहरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गंभीर जखमी झालेल्या अनिता जोहरी यांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच यावल पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अंजाळे घाट परिसरात जड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असून, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि बेदरकार वाहनचालकांमुळे अपघातांच्या घटना वारंवार घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या मार्गावर वेग नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची तसेच वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
या दुर्दैवी अपघातामुळे जोहरी कुटुंबावर शोककळा पसरली असून, संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.








