

डोक्यात कुऱ्हाडीने तर चेहऱ्यावर चाकूने वार; तरुण गंभीर जखमी
एम.आय.डी.सी. पोलिसांत गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोन जणांनी कुऱ्हाड आणि चाकूने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्राणघातक हल्ल्यात ‘वसीम’ खाटीक नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी जळगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरसोली येथील ग्रामपंचायत सदस्य शशिकांत वाणी यांच्या सिमेंटच्या दुकानाजवळ सार्वजनिक जागेत दि. ३० मे २०२६ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास वसीम खाटीक हा तिथे आला संशयित आरोपी फैजल रज्जाक शेख (रा. शिरसोली) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाने जुन्या भांडणाचा राग मनात धरून वसीम खाटीक याघ्या सोबत दोन्ही संशयितांनी वसीम खाटीकला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हत्यारांसह हल्ला चढवला. संशयित फैजल रज्जाक शेख याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने वसीमच्या डोक्यात थेट वार केला. त्याच वेळी फैजलच्या सोबत असलेल्या अनोळखी साथीदाराने त्याच्या हातातील धारदार चाकूने वसीमच्या हातावर आणि चेहऱ्यावर सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या भीषण हल्ल्यात वसीम गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासा चक्रांना गती दिली आहे.
याप्रकरणीजखमी चे वडील फिर्यादी फारुख हुसेन खाटीक यांच्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४५९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०९(१) (खुनाचा प्रयत्न), ३५२, आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील आरोपी सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (स.फौ.) श्री. गणेश वाघ या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहे








