“आमच्या लोकांना का वाढत नाही?” या कारणावरून हाणामारी; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- लग्नसमारंभात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाल्याची घटना तिरपोळे (ता. चाळीसगाव) येथे घडली. या प्रकरणी १३ जणांविरुद्ध मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी दुपारी सुमारे २.४५ वाजेच्या सुमारास तिरपोळे गावात लग्नसमारंभ सुरू असताना हा प्रकार घडला. फिर्यादी सरदार छबुलाल ठाकरे (वय ४०, रा. पोहरे, ता. चाळीसगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नमंडपात काही व्यक्तींनी “आमच्या लोकांना का वाढत नाही?” असा जाब विचारल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी काही आरोपींनी हाताने व काठीने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
वादादरम्यान एका आरोपीने जमिनीवर पडलेली लाकडी काठी उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले. तसेच इतर काही व्यक्तींनाही मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी दादाभाऊ सुरेश ठाकरे, लखन सोमनाथ ठाकरे, सचिन दशरथ पगारे, दीपक मंगेश गायकवाड, रमेश रोहिदास गायकवाड, राहुल काशिनाथ भिल, शंकर रोहिदास भिल, दादाभाऊ सुपडू भिल, समाधान लक्ष्मण भिल, पुनम महारू भिल, गोविंदा देवराम मोरे तसेच धामणगाव येथील गणेश सोनवणे व दीपक सोनवणे यांच्यासह एकूण १३ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मेहुणबारे पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. वृत्त लिहिपर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.









