यावल तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ७३०० मीटर तार लांबवली, सक्रिय टोळीची भीती
यावल (प्रतिनिधी):- तालुक्यातील सातोद ते यावल रस्ता तसेच चुंचाळे शिवार परिसरात वीज वितरण कंपनीच्या कामासाठी टाकण्यात आलेली लाखो रुपयांची विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल ४ लाख ६३ हजार रुपये किमतीची सुमारे ७ हजार ३०० मीटर लांबीची तार चोरीस गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


सातोद रस्त्यावरून ३३ केव्ही तार चोरी
सातोदपासून यावलकडे जाणाऱ्या रस्त्यावर वीज वितरण कंपनीच्या ठेकेदारामार्फत खांब उभारणीचे काम सुरू आहे. ठेकेदार अनिल उर्फ शेखर आत्माराम चौधरी यांच्या माध्यमातून यावल शिवारातील चेतन खेडकर यांच्या शेतापासून ते सातोद शिवारातील रमेश वामन तळेले यांच्या शेतापर्यंत ३३ केव्ही विद्युत लाईनचे काम सुरू होते.
या ठिकाणी २८ खांबांवर २७ गाळ्यांमध्ये टाकण्यात आलेली सुमारे ४ हजार ५० मीटर लांबीची आणि अंदाजे २ लाख ८३ हजार रुपये किमतीची तार अज्ञात चोरट्यांनी लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चुंचाळे शिवारातूनही तार चोरी
यापूर्वीही चुंचाळे शिवारात अशाच प्रकारची घटना घडली होती. चुंचाळे येथील आर. जी. पाटील यांच्या गोदामापासून सावखेडासिम वॉटर फिल्टरपर्यंत विद्युत लाईन टाकण्याचे काम सुरू होते. ठेकेदार राहुल दिनकर चौधरी यांनी १८ खांबांवर १७ गाळ्यांमध्ये सुमारे २ हजार २५० मीटर लांबीची तार टाकली होती.
ही अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीची तारही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणीही यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सक्रिय टोळीची भीती
चुंचाळे शिवार, नायगाव रोड तसेच गायरान भागातून यापूर्वीही विद्युत तार चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे विद्युत तार चोरी करणारी संघटित टोळी परिसरात सक्रिय झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वारंवार होत असलेल्या चोरीमुळे वीज वितरण कंपनीचे ठेकेदार आणि शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या घटनांनंतर यावल पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. चोरीस गेलेल्या तारांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील हालचालींची माहिती गोळा केली जात असून संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे.









