
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील तांबापुरा मछली मार्केट परिसरात एका १८ वर्षीय तरुणीला तिच्या भावाला मारून टाकण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शाकीब अस्लम पटेल (वय २०, रा. तांबापुरा, मछली बाजार, जळगाव) याने १ नोव्हेंबर २०२५ ते २० मे २०२६ या कालावधीत पीडित तरुणीला तिच्या भावाला जीवे मारण्याची धमकी दिली. या भीतीपोटी तरुणीला तांबापुरा मछली मार्केट येथील तिच्या राहत्या घरी वेळोवेळी बोलावून, तिच्या संमतीशिवाय बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
या छळामुळे पीडित तरुणीला गर्भधारणा झाली. त्यानंतर संशयित आरोपी शाकीब याने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या आणि त्या खाण्यास भाग पाडले, अशी तक्रार जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पीडितेने दिली आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (S.D.P.O.) नितीन गणपुरे यांनी जळगाव भाग परिसरात भेट देऊन पाहणी केली. एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.
या प्रकरणी संशयित आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(२)(m), ८९ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक झालेली नसून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) माधुरी बोरसे करत आहेत.








