जळगाव (प्रतिनिधी):- तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यावर वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूळ जळगावची असलेली आणि सध्या पुणे येथे नोकरी निमित्त राहत असलेली २३ वर्षीय पीडित तरुणी आणि संशयित आरोपी रोशन निकम (वय ३३, रा. जळगाव) हे एकमेकांच्या परिचयाचे होते. रोशन याने मार्च २०२४ ते ११ मे २०२६ या कालावधीत तरुणीला “मी तुझ्याशी लग्न करेन” असे खोटे आश्वासन दिले.
लग्नाचे आमिष दाखवून त्याने तरुणीला जळगाव शहरातील स्टेशन रोडवरील ‘हॉटेल’ तसेच अजंठा चौफुली परिसरातील ‘हॉटेल मध्ये वेळोवेळी नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांपूर्वी पीडित तरुणीने जेव्हा रोशनकडे लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा त्याने नकार दिला. इतकेच नव्हे तर रोशनचे इतर मुलीसोबत असलेल्या संबंधांबाबत विचारले असता, त्याने पीडितेला हाताने बेदम मारहाण करत अश्लील शिवीगाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने जळगाव गाठून पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून १८ मे २०२६ रोजी रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रोशन निकम याच्याविरुद्धगुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक (PSI) अशोक खेडकर करत आहे.









