अविश्वास नाट्यानंतर अखेर पेच सुटला; समर्थकांकडून जल्लोष
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला राजकीय पेच अखेर सोमवारी सुटला असून लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे बाजार समितीतील राजकीय घडामोडींना पूर्णविराम मिळाला असून समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

सोमवारी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य सभागृहात विशेष निवड प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रक्रियेत लकी टेलर यांच्या नावाचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या वेळी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, माजी सभापती सुनील महाजन यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बाजार समितीच्या १२ संचालकांनी तत्कालीन सभापती सुनील महाजन यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. या राजकीय घडामोडीनंतर सुनील महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू होती. अखेर लकी टेलर यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याने बाजार समितीच्या राजकारणातील सस्पेन्स संपला आहे.
नवीन सभापतींच्या निवडीनंतर बाजार समितीच्या पुढील कारभाराला गती मिळणार असल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू आहे.









