अडावद (प्रतिनिधी):- चोपडा तालुक्यातील मंगरूळ गावाबाहेर अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि अडावद पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीत भरलेली वाळू असा एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ट्रॅक्टर चालकाविरुद्ध अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलेश विश्वासराव सोनवणे आणि अडावद पोलिसांचे पथक शुक्रवार, १५ मे रोजी सायंकाळी परिसरात गस्तीवर होते. रात्री ८:०० वाजेच्या सुमारास मंगरूळ ते मंगरूळ फाटा जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांना एक निळ्या रंगाचे विना क्रमांकाचे ‘सोनालिका’ कंपनीचे ट्रॅक्टर संशयास्पदरित्या येताना दिसले.
पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून त्याची तपासणी केली असता, ट्रॉलीमध्ये बेकायदेशीरपणे उपसा केलेली अंदाजे १ ब्रास वाळू आढळून आली. ट्रॅक्टर चालकाकडे या वाळू वाहतुकीबाबत महसूल विभागाचा कोणताही अधिकृत पास किंवा परवाना नव्हता. शासनाचा महसूल बुडवून चोरट्या मार्गाने या गौण खनिजाची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले.
साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी कारवाई करत ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे निळ्या रंगाचे सोनालिका ट्रॅक्टर व ट्रॉली आणि त्यातील ४ हजार रुपयांची १ ब्रास वाळू असा एकूण ४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालक बळीराम लक्ष्मण कोळी (वय २७, रा. सुटकार, ता. चोपडा, जि. जळगाव) याला ताब्यात घेतले आहे.
अडावद पोलिसांत गुन्हा दाखल
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलेश सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात आरोपी बळीराम कोळी याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३०३(२) अन्वये वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अडावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) प्रमोद तात्यासाहेब वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल चंदूलाल सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे चोपडा तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.









