
जळगाव जिल्ह्यात पोलिसांची धडक मोहीम
जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून व्यापक नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत उघड्यावर दारू प्राशन करणारे, गांजा ओढणारे, टवाळखोर, कर्कश सायलेंसर वापरणारे तसेच ट्रिपल सीट वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला.
जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या या मोहिमेदरम्यान तब्बल २,२०० वाहनांची तपासणी करण्यात आली.

मोटार वाहन कायद्यान्वये ५७६ केसेस दाखल करण्यात आल्या असून, एकूण ४ लाख ७२ हजार ५० रुपये (४,७२,०५० रुपये) दंड वसूल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिमेदरम्यान उघड्यावर दारू पिणाऱ्या १२ जणांवर, तर उघड्यावर गांजा ओढणाऱ्या ७ जणांवर कारवाई करण्यात आली.
कर्कश हॉर्न वाजविणाऱ्या वाहनांवर २, तर कर्कश सायलेंसर वापरणाऱ्या वाहनांवर १ कारवाई करण्यात आली. याशिवाय ट्रिपल सीट वाहनचालकांविरुद्ध ४७ कारवाया करण्यात आल्या. तसेच ३ वाहने जमा करण्यात आली असून, ड्रंक अँड ड्राइव्हच्या २० केसेस दाखल करण्यात आल्या आणि कलम ६६/१९२ अन्वये ४ केसेसही नोंदविण्यात आल्या.
जिल्ह्यातील नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान किंवा अमली पदार्थांचे सेवन करू नये तसेच वाहन चालविताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.








